17/06/2024
Spread the love

मनोर, पालघर तालुक्याच्या हद्दीत मनोर-वाडा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. महामार्गालगत टेन नाक्यावरील उतारावर मनोर बाजूकडील रस्‍त्‍यावर जीवघेणा खड्डा पडला असून खड्ड्यात वाहने आदळून नादुरुस्त होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्‍याने रोष व्‍यक्‍त करण्यात येत आहे. त्‍यामुळे वाहनचालकांची गैरसोय दूर करण्यासाठी खड्डे बुजवण्याची मागणी केली जात आहे.
मनोर-वाडा भिवंडी रस्त्याची ओळख खड्ड्यांचा रस्ता म्हणून होत आहे. येथील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. त्‍यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेल्या हलगर्जीपणामुळे काही वर्षांपूर्वी येथील सुप्रीम इन्फ्रा कंपनीकडून सदरील दुरुस्‍तीचा ठेका रद्द करण्यात आला होता. राज्य सरकारने या रस्‍त्‍याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली होती.
यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी मनोर-वाडा भिवंडी रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र पावसाळा सुरू होताच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून चाळण झाली आहे. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहनांचा वेग मंदावल्याने इंधनाच्या खर्चात वाढ होत असल्‍याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे. खड्ड्यांमध्ये आदळून अवजड वाहनांचे टायर पंक्चर होणे आणि अन्य दुरुस्तीच्या कामांमध्ये वाढ होऊन वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. दरम्यान, खड्डे बुजवण्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *