17/06/2024
Spread the love

मुंबई, अजित पवारांच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला आहे. अशातच आज पुन्हा एकदा सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. मोदी इतरांना चोर म्हणतात, पण आताच्या भाजपमध्ये 70-75 टक्के लुटीचा आणि आणि चोरीचा माल आहे, असं म्हणत सामनातून थेट मोदींवर हल्ला चढवण्यात आला आहे. तसेच, भ्रष्टाचाऱ्यांना व्यापारी वृत्तीने पाठीशी घालणं हा ‘गुजरात पॅटर्न’ आहे. संपूर्ण देशात तो लागू होताना दिसतोय, असं म्हणत सामना अग्रलेखातून भाजपला टोलाही लगावण्यात आला आहे. ‘सब भूमी गोपाल की’ याप्रमाणे ‘सब चोर भाजप के’ असेच आता वाटतंय, असं म्हणत भाजपवर टीका करण्यात आली आहे.
“काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमध्ये बोलताना केला. हे त्यांचे बोलणे नेहमीचेच आहे. पंतप्रधानांना खरं तर स्वपक्षाविषयी बोलायचे होते, पण चुकून तोंडातून काँगेसचे नाव आले. काँगेस किंवा अन्य राजकीय पक्ष ‘लूट की दुकान’ असेल तर तो लुटीचा माल विकत घेऊन भाजप आपले घर का भरत आहे? याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी करायला हवा”, असा सवालही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही फैलावर घेण्यात आलं आहे. “मुळात भाजप हाच आता राष्ट्रीय चोर बाजार झाला आहे. चोरीचा, लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून तो बदनाम झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे मोदींचीच थुंकी झेलून म्हणतात, ”मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. येताना दोघांना घेऊन आलो.” हे दोघे म्हणजे शिंदे-अजित पवार. दोघांवर अमाप भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. म्हणजे ”येताना भ्रष्टाचाराचा व लुटीचा माल घेऊन आलो,” असेच श्रीमान फडणवीस यांना सांगायचे असावे.”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळ्यात भ्रष्ट पक्ष, त्याच पक्षाला लगेच मांडीवर घेतलं : सामना
“पंतप्रधान मोदी आठ दिवसांपूर्वी म्हणाले होते, ”राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळय़ात भ्रष्ट पक्ष आहे.” त्याच राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी लगेच मांडीवर घेतले. आता मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरदेखील हल्ला केला. केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार असा आरोप मोदी यांनी केला. आता आम्हाला भीती वाटते ती केसीआर पक्षाची. कारण मोदी ज्या पक्षाला भ्रष्ट मानतात तो पक्ष पुढच्या काही काळात भाजपचा मित्र बनून सत्तेत सहभागी होतो किंवा त्या भ्रष्ट पक्षात फूट पाडून त्यातला सगळय़ात भ्रष्ट गट भाजपवासी केला जातो. हाच भाजपचा राजकीय शिष्टाचार बनला आहे.”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *