17/06/2024
Spread the love

मुंबई, राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्या नऊ मंत्र्यांचं निलंबन केलं आहे, मग विधानसभा अध्यक्ष त्यांना अपात्र का ठरवत नाहीत असा सवाल करत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत असा सवाल त्यांनी विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करुन सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर लगेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या गटात 36 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सिद्ध झाल्यास त्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. असं झालं तरच त्यांचं निलंबन रद्द होईल, असं कायदा सांगत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आतापर्यंत फुटीर गटाकडे 36 आमदार दिसत नाहीत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तर काही आमदार अटी टाकून फुटीर गटाकडे जात असल्याचंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्र्याचं निलंबन केलं आहे, मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत? असा सवाल करत हा संपूर्ण पक्षपातीपणा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. फुटीर गटाकडे 36 आमदार नसतील तर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सध्याच्या राजकारणात सुरू असलेलं प्रकरण हा फक्त राष्ट्रवादीचा प्रश्न नसून हा राज्याचा प्रश्न आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *