17/06/2024
Spread the love

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीकडून आंदोलन सुरु केले आहे. मंडई परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे भाजपने या आंदोलनास उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन अन् विरोधकांचे आंदोलन सुरु असल्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विरोधकांनी पुण्यातील मंडई परिसरात आंदोलन सुरु केले आहे. मोदी यांनी मणिपूर विषयात चूप्पी तोडावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी पोहचलेले काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमच्या नेत्यांना अटक केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ईशारा महाविकास आघाडीकडून करण्यात येणार आहे. पुण्यातील अंबिल ओढा चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पाच हजार पोलिस कर्मचारी तैनात केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सर्व विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेस नेत्या संगिता तिवारी यांनी म्हटले की, मणिपूर जळत असताना सत्कार अन् पुरस्कार कसले स्वीकारताय. आम्ही मोदी यांच्या या दौऱ्यास विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाकडून होणाऱ्या आंदोलनामुळे पुणे पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांना सोमवारीच नोटीसा बजावल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम 149 नुसार ही नोटीस बजावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *