17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. निवडणुका आल्याने प्रत्येक राज्यात पेटवापेटवी सुरू आहे. प्रत्येक राज्यात अशा प्रकारच्या दंगली होतील. भाजपची निवडणुकी आधी खेळली जाणारी ही जुनी नीती आहे. महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर अशा प्रसंगांना सामोरे जावं लागेल, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मणिपूरच्या हिंसेप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक शिष्टमंडळ भेटणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयानेही मणिपूरबाबत चिंता व्यक्त केली आहे. कायदा सुव्यवस्था आणि अत्याचारावर चिंता व्यक्त केली आहे. आम्ही सभागृहात आणि बाहेर हा मुद्दा उठवत आहे. पण आमचं कोणी ऐकत नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत. जे खासदार मणिपूरला गेले होते. त्यांनाही सोबत घेऊन जाणार आहोत. राष्ट्रपतींना आम्ही मणिपूरची स्थिती सांगू. परिस्थितीचं कथन करण्यासाठी मणिपूरचा लढा संसदेत आणि बाहेर सुरू राहील, असं संजय राऊत म्हणाले.
देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. ते रोखायचं आहे. दिल्लीला पूर्ण राज्य देण्याचं आश्वासन भाजपने दिलं होतं. पण आहे तो अधिकारही काढून घेत आहे. हे काय आहे? लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून निवडून दिलेल्या सरकारला काम करू दिलं जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने काम करू द्या म्हणून सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या या हुकूमशाहीला विरोध करणार आहोत, असं राऊत यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका शरद पवार यांना न भेटता कालच्या पुण्यातील कार्यक्रमातून निघून गेले. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ते आपल्या काकांना भेटले नाही. त्यांना पाहिलं नाही याला आम्ही काय करणार? हा काय प्रश्न आहे का? मी दिल्लीत आहे. अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात. उत्तरं नंतर मिळत असतात, असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मोदींसोबत स्टेज शेअर करणं गुन्हा नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. आमचे राजकीय मतभेद आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात लढत राहू. महाराष्ट्र सुद्धा सर्जिकल स्ट्राईकच करेल. पवार-मोदी कार्यक्रमावर वाद झाले आहेत. त्यावर आम्ही पडदा टाकू. महाराष्ट्रावर संकट आलं. राज्याला अपमानित करण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीच्या शत्रूने जेव्हा जेव्हा हल्ला केला, तेव्हा महाराष्ट्राने सर्जिकल स्ट्राईक केला. महाराष्ट्र जेव्हा सर्जिकल स्ट्राईक करेल तेव्हा शरद पवार आमच्यासोबत राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *