17/06/2024
Spread the love

मुंबई: अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 3 जुलै रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आता ट्रेलर रिलीजनंतर उज्जैनमधल्या महाकाल मंदिरातील पुजारी आणि साधू-संतांनी चित्रपटाचा तीव्र विरोध केला आहे. जोपर्यंत या चित्रपटातून महाकाल मंदिराचे सीन्स हटवले जात नाहीत तोपर्यंत हा विरोध करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या विरोधानंतरही कोणताच बदल न करता चित्रपट प्रदर्शित झाल्यास आम्ही कोर्टाची पायरी चढू आणि FIR सुद्धा दाखल करू, असं त्यांनी म्हटलंय.
याविषयी महाकाल मंदिराचे पुजारी पंडित महेश गुरू म्हणाले, “हा एक अश्लील चित्रपट आहे. कारण ज्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ‘A’ प्रमाणपत्र मिळतं, त्याला अश्लील मानलं जातं. या चित्रपटातील काही सीन्स महाकालेश्वर मंदिरात शूट केले आहेत, म्हणून आम्ही त्याचा विरोध करत आहोत. हा चित्रपट कोणत्याही विषयावर का असेना मात्र जोपर्यंत त्यातील महाकाल मंदिराचे सीन्स हटवले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही विरोध करणार.”
चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात FIR दाखल करण्याचीही तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काही दिवसांत अक्षय कुमार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना नोटीससुद्धा बजावली जाईल. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांसोबतच स्वस्तिक पीठाचे पीठाधीश्वर परमहंस अवधेशपुरी महाराजांनी या चित्रपटावर आक्षेप नोंदविला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर चित्रपटाला A प्रमाणपत्र मिळालं आहे तर त्याचा अर्थ हा चित्रपट 18 वर्षांपेक्षा कमी असलेले लोक पाहू शकत नाहीत. या चित्रपटाची कथा सेक्स एज्युकेशनवर आधारित आहे. त्यामध्ये सेन्सॉर बोर्डाने नागा साधूंचे व्हिज्युअल्स, शाळेच्या नावात बदल यांसह इतरही बदल सुचवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *