17/06/2024
Spread the love

मुंबई: राज्यातील मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. अनेक महापालिकांवर प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी वारंवार सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे. सरकारमुळेच या निवडणुका रखडल्याचा दावा विरोधकांनी केला होता. मात्र, विरोधकांच्या या दाव्यातील हवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतली आहे. राज्य सरकारने निवडणुका अडवून ठेवलेल्या नाहीत, असं जाहीर विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधान परिषदेत एका प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी हा खुलासा केला आहे.
निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. निवडणूक घेण्याचा अधिकार मुंबई महापालिका 1888 कलम 18 (1) अन्वये महापालिकेच्या सर्व निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2022 अन्वये महापालिकेला सार्वत्रिक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जाणीवपूर्वक सांगतो, मुंबई महापालिकेसहीत सर्व पालिकेच्या आम्हाला निवडणुका हव्या आहेत. आम्ही तयारीत आहोत. आम्हाला पाहिजे निवडणूक. पण सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाता येत नाही. तरीही आपल्याला वाटत असेल तर निवडणूक आयोग स्वायत्त आहे. तुम्ही जाऊन त्यांच्याकडे माहिती घ्या. नसेल तर सर्व मिळून आपण एकत्र जाऊ आणि निवडणूक घेण्याची मागणी करू, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *