17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : सध्या जागतिक अर्थव्यवस्था सुस्तावली आहे. तर काही ठिकाणी मंदी सदृश्य वातावरण आहे. जगातील अनेक देशांना रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला आहे. या सर्व वातावरणात जगाचे भारताकडे लक्ष लागले आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठ्या जोमाने आगेकूच करत आहे. भारताने टॉप-10 अर्थव्यवस्थेमध्ये अवघ्या काही वर्षांतच पाचव्या स्थान झेप घेतली आहे. येत्या चार वर्षांत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज अनेक मानांकन संस्थांनी वर्तवला आहे. लवकरच भारत जर्मनी आणि जपानला मागे टाकण्याची शक्यता आहे. तर जगातील अनेक महाशक्ती सुस्तावल्या आहेत. त्यामुळे भारत चीनला पण धोबीपछाड देईल, असा नवा आशावाद उदयाला येत आहे, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी त्याचे एक गणित मांडले आहे.
काही वर्षांपूर्वी भारत मोठी भरारी घेऊ शकणार नाही, असा अंदाज जागतिक संस्था नोंदवत होत्या. पण भारतीय अर्थव्यवस्थेने झपाट्याने पाऊल टाकले. त्यानंतर भारताकडे पाहण्याचा चष्मा या संस्थांना बदलावा लागला. या संस्थांना भारतीय अर्थव्यवस्थेविषयी अचानक विश्वास वाटायला लागला.
गोल्डमॅन, एसबीआय, एसअँडपी, मूडीज या संस्थासह इतर फर्मने भारत काही दिवसांत जागतिक अर्थव्यवस्थेतील खास भिडू असेल यावर शिक्कामोर्तब केले आहे. 2075 पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकेल, असा अंदाज आहे. तर चीनला 2047 मध्ये धोबीपछाड देईल. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नेमका हाच धाग पकडला आहे.
नव्या भारताच्या या रुपाबद्दल आणि आर्थिक महाशक्ती म्हणून उदयाविषयी आनंद महिंद्रा अनेक दिवसांपासून भाकित वर्तवित आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भारत आर्थिक महाशक्ती असेल असा दावा केला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत महिंद्रा अँड महिंद्राच्या मोठा पल्ला गाठला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आनंद महिंद्रा यांनी भारत कसा फायद्यात आहे, याचे गणित मांडले. सध्याच्या भू-राजकीय घडामोडींचा मोठा फायदा भारताला होत आहे. चीनला सोडून अनेक जागतिक कंपन्यांनी भारतात नांगर टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय उत्पादन कंपन्या चीनी कंपन्यांच्या तुलनेत जास्त पिछाडीवर नाहीत. जग लवकरच चीनला बेदखल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केवळ भू-राजकीय तणाव व चीनच्या महत्वकांक्षेचाच फटका या देशाला बसला नाही. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या जोमाने आणि नेटाने आगेकूच करत आहेत. जागतिक कंपन्या त्यामुळे भारताकडे आशेने पाहत आहेत. भारतात निर्मिती, उत्पादन खर्च कमी असल्याने जागतिक कंपन्यांना फायदा होत आहे. त्यामुळेच Apple, Samsung, Boeing आणि Toshiba सारख्या कंपन्या भारतात कारखाने उभारत असल्याचा दावा त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *