17/06/2024
Spread the love

मुंबई : भाजपला हरवण्यासाठी आणि आगामी निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांनी एकजूट केली आहे. ‘INDIA’ विरोधकांच्या या आघाडीचं नाव आहे. या विरोधी पक्षांच्या ‘INDIA’ आघाडीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. या बैठकी बाबत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीची आज बैठक झाली. यात पुढच्या ‘INDIA’ च्या बैठकीवर चर्चा झाली. पाटना, बंगळुरूनंतर आता मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ग्रँड हयातला ही बैठक होईल. त्याआधी 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी डिनरचं आयोजन केलं आहे. यात ‘INDIA’चे सर्व नेते उपस्थित असतील.
किमान पाच राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत येणार आहेत. बिहार, तामिळनाडू, दिल्ली, बिहार झारखंडचे मुख्यमंत्री येणार आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसहीत अनेक बडे नेतेही येणार आहेत. त्यासाठी आम्ही सगळेचजण तयारी करत आहोत, असं संजय राऊत म्हणालेत.
मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचं यजमानपद शिवसेनेकडे असेल. काँग्रेस आणि राष्ट्र्वादी आमच्यासोबत आहेत. आम्ही एकत्र काम करू, असं आजच्या बैठकीत ठरलं. बैठकीच्या अनुषंगाने प्रत्येकाकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पाटणा आणि बंगळुरूप्रमाणे ही बैठक यशस्वी होईल. पुढच्या कामाला आम्ही सुरुवात करू. बैठक यशस्वी करण्यावर सर्वांचं एकमत आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
राज्यात आमचं सरकार सध्या सत्तेत नाही. यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी बैठक झाली. तिथे आमच्या घटक पक्षांचं सरकार होतं. मात्र इथं महाराष्ट्रात आमचं सरकार नाही. त्यामुळेही बैठक आमच्यासाठी निश्चितच एक मोठा टास्क आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.
महाविकास आघाडीची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईतील वरळीत ही बैठक पार पडली. दोन तास ही बैठक झाली.या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *