16/06/2024
Spread the love

मुंबई: मुंबईतील लोकलमध्ये सीरिअल बॉम्बस्फोट करण्यात येणार आहे, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. या फोननंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली असून पोलिसांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आणि अवघ्या दोन अडीच तासातच फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहे. फोन करणाऱ्याला अटक केल्यानंतर हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिली. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहेत. मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असं या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी कोणत्या लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असं विचारताच फोन करणाऱ्याने लगेच फोन कट केला. पोलिसांनी लगेच त्यानंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने फोन बंद केला होता. त्यानंतर पोलीस तात्काळ अलर्ट मोडवर आले. एकीकडे पोलिसांनी याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. तर दुसरीकडे फोन कॉल कुठून आला याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
कंट्रोल रुमला फोन आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे आरोपीचं लोकेशन शोधून काढलं. आरोपी जुहू परिसरात असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी लगेच जुहू पोलिसांना याबाबतची माहिती दिली. जुहू पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
अवघ्या दोन अडीच तासातच जुहू पोलिसांनी या फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल करणाऱ्या अशोक मुखियाला जुहू पोलिसांनी विलेपार्ले येथील नेहरू नगर परिसरातून अटक केली आहे. तो 25 वर्षांचा आहे. तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. आरोपी बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध बिहारमध्येही गुन्हा दाखल आहे. आता मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसचे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे.
त्याने पोलिसांना फेक कॉल केल्याची माहिती उघड झाली आहे. सध्या आरोपीने धमकी का दिली?, तो दारूच्या नशेत होता का? या सर्व प्रश्नांचा तपास सध्या जुहू पोलीस करत आहेत. कोणत्याही रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आलेला नाही आहे. हा फक्त एक बनावट कॉल होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *