17/06/2024
Spread the love

सांगली : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास सांगली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून पाच महिलांची सुटका केली आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ एका अपार्टमेंटमध्ये हा धंदा सुरु होता. याप्रकरणी जागा मालकाला अटक केली आहे, तर एजंट फरार झाला आहे. विक्रम पंडित कल्याणकर असे अटक जागा मालकाचे नाव आहे. तर इम्रान युनुस मुल्ला असे फरार एजंटचे नाव आहे. याबाबत अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे लपून वेश्याव्यवसाय सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना सांगली मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळच असलेल्या कल्याणकर प्लाझामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये स्पा सेंटर, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून वेश्याव्यवसायाची खातरजमा केली. मग या स्पा सेंटरवर छापा टाकला. छापेमारीत स्पा सेंटरमधील पाच महिलांची सुटका करण्यात आली.
सदर जागेचा मालक विक्रम कल्याणकर याला पोलिसांनी अटक केली आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार एजंटचा शोध घेत आहेत. पोलील अटक आरोपीचीही कसून चौकशी करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरु असलेल्या गोरखधंदा सुरु असल्याचे उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *