16/06/2024
Spread the love

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. याचा टीझर काल प्रदर्शित झाला. यात संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासावर भाष्य केलं. देशातील तपास यंत्रणांवर भाष्य केलं आहे. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरही संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना म्हणजे अग्निकुंड, शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं, असं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं आहे. ईडी ही एक दहशतवादी संघटना आहे, असं वक्तव्यही राऊतांनी केलं आहे.
संजय राऊत यांची सविस्तर मुलाखत आज आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणार आहे. ठाकरेगटाचे सचिव आदेश बांदेकर ही मुलाखत घेणार आहेत. यात संजय राऊत आपल्या शैलीत विरोधकांवर तोफ डागताना दिसणार आहेत. तर याआधीही ‘आवाज कुणाचा’मधून ठाकरे गटातील नेत्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. उद्धव ठाकरे, अनिल परब, कैलास पाटील, नितीन देशमुख यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.
मराठी माणूस, त्याला तुम्ही भिकारी, दरिद्री म्हणत होता, घाटी, कोकणी म्हणून हिणवत होता, त्या माणसाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी ही शिवसेना स्थापन झाली. आता मित्र पक्षांनी फसवलं, म्हणून शिवसेना थांबली का? शिवसेना संपली का?, असं या टीझरमध्ये संजय राऊत म्हणत आहेत.
शिवसेना म्हणजे अग्निकुंड आहे. शिवसेना म्हणजे आग आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं!, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला ललकारलं आहे. शिवसेना ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. शिवसेना ही महाराष्ट्रासाठी संघर्ष करण्यासाठी जन्माला आली आहे. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल, असं ते म्हणालेत.
भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली. त्याला आता क्षमा केली जाणार नाही. भाजपचे लोक घाबरतात. महापालिका निवडणुका घेत नाही, लोकसभा निवडणूक तरी ते घेतील का? ही चिंता आहे. भाजप जनतेला घाबरतं. जो जनतेला घाबरतो तो नेता नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *