17/06/2024
Spread the love

https://amzn.to/3FppFMP

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज बीडमध्ये येत आहेत. बीडमध्ये शरद पवार यांची मोठी सभा होणार आहे. अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवार यांची ही सभा होणार आहे. त्यामुळे शरद पवार कुणावर निशाणा साधणार? अजित पवार गट की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांची ही मोठी सभा होणार आहे. या सभेला जवळपास 45 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. पवार यांच्या या सभेमुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठं आव्हान उभं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्येच शरद पवार यांची सभा होत आहे. या सभेला 45 हजार लोक येणं ही धनंजय मुंडे यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भविष्यात मुंडे यांचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पवार यांची ही सभा म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची चाचपणी असल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी ही बॅनर्स लावले आहेत. शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत, असं मुंडे समर्थकांचं म्हणणं आहे. मुंडे यांच्या समर्थकांनी अजित पवार यांच्या समर्थनात आशीर्वाद द्या, अशा आशयाचे बॅनर्सही शहरभरात लावले आहेत. त्यावर शरद पवार यांचाही फोटो आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, शरद पवार यांनी कालच इतर गटांनी माझा फोटो वापरू नका, नाही तर मला कोर्टात जावं लागेल, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *