17/06/2024
Spread the love

मुंबई : महादेव ऑनलाइन ॲप केसमध्ये मोठी कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. या बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानचेही नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आल्याचे काल उघड झाले होते. आता याप्रकरणात आणखीही बड्या लोकांची नाव गुंतल्याचेही समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवला आहे. हे दोघेही डाबर ग्रुपचे चेअरमन आणि डायरेक्टर असल्याचं सांगण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी ही कारवाई करण्यात आली.
नुकतेच केंद्र सरकारने महादेव ॲपवर बंदी घातली आहे. हे ॲप आणि त्याच्याशी संबंधित लोक हे ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणी ईडीने छत्तीसगडमधून दोन पोलिसांनाही अटक केली आहे. खरंतर माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर गेल्या आठवड्यात दि कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार महादेव बेटिंग ॲपबाबत मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला होता. यामध्ये 31 जणांविरुद्ध एफआयआर आहे, तर 32 क्रमांक अनोळखी लोकांविरुद्ध आहे. एफआयआरच्या कॉपीमध्ये आरोपी नंबर 16 आणि आरोपी नंबर 18 हे मोहित बर्मन आणि गौरव बर्मन आहेत. एफआयआरमध्ये मोहित बर्मनचा पत्ता फोर्ट येथील दाखवण्यात आला आहे, तिथे त्याच्या गुंतवणूक कंपनीचे कार्यालय आहे.
मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी माटुंगा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवली होती. ही एफआयआर खिलाडी ॲपच्या विरोधात दाखल करण्यात आली, ते महादेव बुकचे सपोर्टिंग ॲपदेखील आहे. महादेव ॲप प्लॅटफॉर्मचा किंगपिन सौरभ चंद्राकर याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ मुश्ताकीमशी हातमिळवणी केल्याचे वृत्तसमोर आले होते. सौरभ आणि मुश्ताकीम यांनी मिळून एक गेम ॲप लॉन्च केले. या ‘खेलोयार’मध्ये एक ॲप आहे जे भारत आणि पाकिस्तानमध्ये चालवले जात आहे. मुंबईत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सौरभ चंद्राकर, मुश्ताकीम, रवी उप्पल आणि इतर अनेकांकडून मॅच फिक्सिंग रॅकेट चालवल्याचा उल्लेख आहे.
प्रकाश बनकर यांच्या तक्रारीनुसार, एफआयआरमध्ये आरोपी चंदर अग्रवाल आणि लंडनचे रहिवासी दिनेश खंबाट हे भारतात आयोजित क्रिकेट लीगमधील मॅच फिक्सिंगचे मुख्य सट्टेबाज असल्याचा उल्लेख आहे. आणि हे वेबसाइट्स आणि ॲप्सद्वारे देखील केले जाते. आरोपी अमित शर्मा या त्या दोघांशी निगडीत असून तो त्यांना या प्रक्रियेत मदत करतो. चंदर अग्रवालची लीगमध्ये बॅकडोअर भागीदारी आहे आणि त्याला दुबईतील कनेक्टिंग व्यक्ती हेमंत सूद आणि रोहित कुमार मुरगोई यांनी मदत केली, ्से नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *