17/06/2024
Spread the love

सातारा : शहरात सध्या चोऱ्या-माऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पोलिसांच्या वाढत्या गस्तीनंतरही गुन्हेगारांचा हैदोस सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून धूमस्टाईल चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या टोळीनेही धूमाकूळ माजवला होता. त्यामुळे सामान्य नागरिक अक्षरश: जीव मुठीत धरून जगत होते. अखेर नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. धूमस्टाईल चोरी करून पळून जाणाऱ्या KTM गँगला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
या टोळीतील पाच चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील 3 आरोपी पुण्यातल्या मुळशीचे असल्याचं सांगण्यात आलं आहे. सातारा पोलीसांनी इतिहासातली सर्वात मोठी कारवाई केली असुन यात तब्बल 1 किलो सोनं आणि 5 किलो चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेल्या मालामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांशिवाय एक KTM बाईक तसेच गुन्ह्यासाठीत वापरण्यात आलेली हत्यारं सुद्धा जप्त करण्यात आली आहेत.
गाडीतून येणारे हे चोरटे बंद घर हेरून त्यात घरफोडी करयाचे आणि माल घेऊन फरार व्हायते. मात्र सातारा पोलीसांनी मोठ्या शिताफिनं यांना ताब्यात घेऊन हा मुद्देमाल हस्तगत केला. आता पर्यंतची ही साताऱ्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
सातारा पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत सापळा रचून या पाचही चोरांच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर आली आहे. या चोरट्यांच्या गँगने सातारा जिल्ह्यातील मेढा,मल्हारपेठ,वाई,सातारा तालुका,बोरगाव,खंडाळा,शिरवळ,भुईंज,वाठार,उंब्रज आणि वडुज या भागातील 27 हून अधिक ठिकाणी घरफोडी करत ऐवज पळवला. खुद्द आरोपींनीच त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
एवढेच नव्हे तर या चोरट्यांनी सातारा,पुणे,अहमदनगर,कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातही हैदोस घातला. त्यांच्या चोरीचे क्षेत्र फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हे तर त्यांनी गुजरात आणि कर्नाटकमध्ये जाऊनही अनेक ठिकाणी चोरी केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *