16/06/2024
Spread the love

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ‘लियो’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता मंसूर अली खान याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याने तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून आता तृषाने एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली आहे. तृषाने या पोस्टमध्ये मंसूर अली खानबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासोबतच तिने त्याच्यासोबत कधीच काम न करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तृषाबद्दलच्या टिप्पणीनंतर मंसूरने इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र त्यानंतरही नेटकऱ्यांकडून त्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे.
मंसूर अली खानला तृषासोबत चित्रपटात एक सीन करायचा होता. याविषयी तो व्हिडीओत म्हणतो, “जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचा आहे, तेव्हा मी विचार केला की एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी याआधीही बलात्काराचे अनेक सीन्स शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. मात्र काश्मीरमध्ये शूटिंग सुरू असताना मला तृषाला पहायलासुद्धा दिलं गेलं नाही.”
मंसूरचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. अनेकांनी त्याच्यावर टीका केली. आता तृषाने मंसूरच्या व्हिडीओवर सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने लिहिलं, ‘नुकताच एक व्हिडीओ माझ्या निदर्शनास आला, ज्यामध्ये मंसूर अली खान माझ्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि वाईट भाषेत बोलताना दिसत आहे. मी याचा तीव्र विरोध करते. त्याची ही टिप्पणी स्त्रीविरोधी, अपमानजनक, अत्यंत वाईट आणि तिरस्कार करण्याजोगी आहे. त्याने माझ्यासोबत काम करण्याची स्वप्न पाहत राहावी पण त्याच्यासारख्या बेकार व्यक्तीसोबत मी स्क्रीन शेअर केला नाही यासाठी मी खूप आभारी आहे. माझ्या उर्वरित करिअरमध्येही मी त्याच्यासोबत कधी काम करणार नाही. त्याच्यासारखे लोक माणुसकीला वाईट ठरवतात.’
याप्रकरणी ‘लियो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. “अशा प्रकारची टिप्पणी ऐकून मलाही खूप राग आला. आम्ही सर्वजण एकाच टीममध्ये काम करतो. पण कोणत्याही महिलेसोबतची अशी टिप्पणी सहन केली जाणार नाही”, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *